डिचोली : देशभरात वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांमुळे हिंदू समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हिंदू मुलींची फसवणूक व बेपत्ता होण्याच्या घटनांवरून गोव्यातही आता आवाज उठू लागला आहे. यासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आज एका स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेतून गोवा सरकारकडे धर्मांतरविरोधी कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
डिचोली येथील श्री नित्यानंद महाराज मठात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कीर्तनकार ह.भ.प. किरणबुवा तुळपुळे कीर्तनात बोलताना म्हणाले, “हिंदू समाजाने आपल्या मुलींचे रक्षण आणि धर्मरक्षणासाठी एकजूट होणे काळाची गरज आहे. काश्मीरमध्ये 1990 मध्ये झालेले हिंदूंचे विस्थापन ही संघटनेअभावी घडलेली शोकांतिका होती. मधमाश्यांप्रमाणे संघटित झालो तर कोणीही आपल्यावर सहज हल्ला करू शकत नाही.”
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून स्वाक्षऱ्या करून समर्थन दिले. निवेदनाद्वारे गोवा सरकारने लव्ह जिहादसारख्या कटकारस्थानांना आळा घालण्यासाठी कठोर धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

