ठाणे – देव आणि धर्माच्या नावाखाली चमत्कार करणाऱ्या बुवा-बाबां-मांत्रिकांकडून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, बुवाबाजीला सुरुंग लावण्यासाठी चमत्कार करण्याचा दावा करणाऱ्यास, चमत्कार दाखवा १ लाख मिळवा, असे आव्हान दिले. ही रक्कम वाढवून नंतर ५ लाख, १० लाख, १५ लाख व आता २१ लाखांवर आणली आहे, पण हे आव्हान आजतागायत बुवा, बाबा, मांत्रिक, चमत्कार करण्याचा दावा करणाऱ्यांनी स्वीकारलेली नाही, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. संजय बनसोडे यांची महा.अंनिसच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ठाणे नगरीत पुरोगामी संघटनांच्यावतीने जाहीर नागरी सत्कार समारंभ सोमवारी, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनएपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., कामगार नेते व विचारवंत राजन राजे,’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, अध्यक्षस्थानी प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, महा.अंनिसच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’च्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन ठाणे शहर सचिव अशोक मोहिते यांनी केले.*
जगात चमत्कार नसतातच, हातचलाखी व विज्ञान- तंत्रज्ञानाशिवाय चमत्कार करताच येत नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्काराच्या विरोधात, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात गत ३६ वर्षात केलेल्या अविरत कामामुळे आता उघडपणे चमत्कार करण्याचा दावा करणारे चमत्काराची भाषा करणारे बुवा, बाबा, मांत्रिक शोधून सापडणार नाहीत, याचे संपूर्ण श्रेय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जाते. दुसर्या टप्प्यात, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणे, नंतर संत परंपरेचा वारसा व सुधाकरांचा आधार घेऊन भारतीय सण, उत्सवाची चिकित्सा सुरु केली. शिवफुलेशाहूआंबेडकर, तुकाराम महाराज, गाडगेबाबा, कबीर आदींचा अंधश्रद्धेविरोधातील विचार नव्याने सांगण्याचा प्रयत्न केला, संविधानिक मूल्यांचा प्रचार यावर भर दिला. पर्याय देऊन विसर्जित गणपती दान करा, निर्माल्य नदीत टाकू नका त्याचे कंपोस्ट खत करा, गणपती छोटे करा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती न करता ते मेटलचे करा… कोल्हापुरातून सुरु झालेली ही चळवळ आता सर्वदूर पसरली आहे. दिवाळीत ५०० रुपयाचे फटाके वाजविण्यापेक्षा २०० रुपयाचे फटाके वाजवून ३०० रुपयाची पुस्तके खरेदी करा नंतर दिवाळी हा दिव्यांचा सण आहे यामुळे कोणत्याच सणाला फटाके वाजवू नका…सर्व जातीच्या जात पंचायततीला विरोध केला पण अद्याप राजकीय पाठिंब्यामुळे बुवाबाजी टिकून आहे. जोडीदाराची विवेकी निवडद्वारा सर्व प्रक्रिया शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांना समजावून सांगून आणि सहमतीने जोडीदाराची निवड करण्यास प्रोत्साहन देतो, विवेकाने एक एक माणूस जोडल्यावरच लाखो माणसे जोडली जातात, विवेकाची चळवळ मजबूत होते, टप्प्याटप्प्याने कार्यकर्ते घडविणे व ते टिकवून ठेवण्याचे काम डाॅ नरेंद्र दाभोलकर व अविनाश पाटील यांनी केले, याच जोमाने ही चळवळ वाढविणे व देशाच्या विकासात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे योगदान आहे, असे मत संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

