दिवा (प्रतिनिधी) “आली दिवाळी पण”….”आठणीत आहे…दिवेकरांना चार वर्षापुर्वीची काळी दिवाळी” अश्या आशयाचे फलक भारतीय जनता पार्टी दिवा शहर यांच्याकडून लावण्यात आल्याचे निदर्शनास आले असून ४ वर्षापुर्वी विकासाच्या नावाखाली सामान्य् दिवेकर नागरिकांचे गाळे,घरे तोडून बेघर झालेल्यांप्रती आठवण ताजी करुन त्यांची “काळी दिवाळी” आजही सुरु असल्याचा मेसेज दिला आहे.
सध्या दिवा शहरात आणि संपुर्ण महाराष्ट्रात दिवाळी सण मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो.मात्र ही उत्सव संकल्पना दिव्यातील बेघर नागरिकांसाठी “काळी दिवाळी” म्हणून साजरी करण्यात येत आहे.दिव्यातील या बेघर केलेल्या नागरिकांसाठी दिवाळी हा सण अंधारात आणि दुखात जाणे सुचित करीत आहे.४ वर्षापुर्वी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर दिवा फाटक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली विकासकांकडून नागरिकांचे व्यवसायिक गाळे,घरे तोडण्यात आले होते.जायंच कुठे आणि रहायचं कुठे?अशी परिस्थिती होती.या नागरिकांनी आपल्या कष्टाच्या, कमाईच्या पैश्यांनी घरे आणि गाळे विकत घेतले होते.त्यांना पडले गावात दुर्गम ठिकाणी महानगरपालिकेकडून घरे देण्यात आली,मात्र या घरांत ना वीज,ना सुरक्षितता,ना स्वच्छता तसेच त्यांचे गाळे तोडल्यामुळे त्यांच्या रोजगारावर आलेली गदा यामुळे त्या जुन्या आठवणी जाग्या करीत भारतीय जनता पार्टीने आता थेट तोडकाम झालेल्या जागी बँनरबाजी करुन येथील विकासकांचा पर्दापाश करण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकांना बेघर करुन फेरिवाले बसवले
भारतीय जनता पार्टीने लावलेल्या बँनरवर विकासाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.दिवाळीच्या तोंडावर विकासकांनी नागरिकांची घरे तोडली.त्यांना बेघर केले.आणि ५० रुपयांच्या हप्त्यांसाठी फेरीवाले बसविले,एका संस्थेने तिथे सार्वजनिक शौचालय उभारले..हाच का तो कार्यसम्राटांचा विकास? असे काम करुन दिव्याचा विकास होणार आहे का? ही घरे फेरीवाले बसविण्यासाठी तोडली होती का? असा प्रश्नही या बँनरमधून विचारण्यात आला आहे.पुढे या आवाहन करताना म्हटले आहे की, “आता वेळ आली आहे ह्या कार्यसम्राटांना फाटकी शाँल व नासलेले श्रीफळ देवून घरी बसविण्याची”, “मतदान बदला दिवा नक्कीच बदलेल” म्हणजेच या आशयातून स्पष्ट असे दिसून येत आहे की, आता बस्स झाले,ज्यांच्यावर तुम्ही कार्यसम्राट म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला बेघर केले आहे.स्थलांतरीत केले आहे, त्यांच्यामुळे तुमच्यावर आज काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे. त्यामुळे एकदा मतदान बदलून पहा तरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत असा संदेश देत दिवेकरांना सूचित करण्यात येत आहे.दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभुमीवर लागलेल्या या बँनरमुळे आता चर्चा तर चांगली रंगली आहे

