दापोली ( विशाल मोरे) अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन तेजस सुरेश नाचरे सीए परिक्षा फर्स्ट Attempt मध्ये उत्तीर्ण झाला असून त्याच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
दापोली तालुक्यातील पोफळवणे गावातील चिनकटे वाडीतील सभासद श्री सुरेश नाचरे आणि सौ सुवर्णा नाचरे यांचा मुलगा तेजस नाचरे सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी समजताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. आपल्या मुलाच्या या यशाने तर त्याच्या आईवडिलांना स्वर्ग चार बोटे उरला. तेजसचे वडील एका प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करतात तर आई घरकाम करते.
तेजस नाचरे हा तसा सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा. अथक परिश्रम करण्याची वृत्ती, शिक्षणाप्रती असणारी धडपड, सच्चेपणा आणि ध्येय निश्चिती तसेच जिद्दीच्या जोरावर त्याला आज हे यश मिळालेले पहायला मिळत आहे.
तेजस हा भांडुप मधील एका छोट्याश्या चाळीमध्ये राहतो. तो अत्यंत गुणी असून इतर मुलांप्रमाणे अभ्यासाशिवाय वायफळ ठिकाणी वेळ वाया घालवलेलं त्याला कुणी पाहिलेलं नाही.
तेजस ने भांडुप मधील अमरकोर शाळेत इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेत असताना तो नेहमीच पहिल्या तिन क्रमांकामध्ये असायचा. तेजस दहावी नंतर काम करून शिकू लागला. पण शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. शिक्षणातील सातत्य त्याने चालू ठेवलं,त्याचेच हे यश आहे. नुकताच त्याच्या श्रीराम सामाजिक सेवा मंडळ भांडूप चाळीतील मंडळाने अगदी कमी वेळात एक छोटासा सत्कार सोहळा आयोजित केला. या दरम्यान त्याला त्याच्या या यशाबद्दल विचारले असता त्याच्या या यशामागे आई बाबांचे प्रचंड कष्ट आणि प्रेरणा आहे असं तो प्रामाणिकपणे म्हणाला.
अश्या अभ्यासू आणि कष्टाळू वृत्ती असलेल्या तेजस नाचरे या विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे गावाचे तालुक्याचे नाव रोशन केले असून सर्व स्तरातून त्याच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.

