ठाणे : ठाण्यात विविध संकल्पनांवर आधारित उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. त्यापैकीच एक अशा राजमाता जिजाऊ उद्य़ान म्हणजेच ऑक्सिजन पार्कचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. लवकरच कळवा येथे नक्षत्र उद्यान विकसित केले जाईल. एकेक संकल्पना घेऊन विकसित होत असलेल्या या उद्यानांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात दिली.
मानपाडा येथील हाईड पार्कसमोर असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे लोकार्पण सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. लोकार्पण केल्यावर सर्व मान्यवरांनी या उद्यानात फिरून तेथील झाडे, औषधी वनस्पती, नागरिकांसाठी असलेल्या सुविधा यांची पाहणी केली.

रस्त्यावरून या उद्यानाच्या आत आल्यावर आपल्याला हवेतील फरक स्पष्टपणे जाणवतो. इथल्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म ऐकल्यावर व्याधीमुक्त होण्यासाठी या उद्यानाची सैर आवश्यक असल्याचे लक्षात येते. व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे बदलेले वेळापत्रक आपण पाहतो आहोत. मराठवाड्यात तर अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. त्याला दिलासा देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आपण शहरातील नागरिकांनीही याची जाणीव ठेवली पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ठाणे शहर बदलतेय. डिसेंबरपर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल. रस्ते रुंद होत आहेत, रिंग मेट्रोचे काम सुरू झाले आहे. मुक्त मार्ग, भुयारी मार्ग या प्रकल्पांमुळे विकसित ठाणे, हरित ठाणे अशी शहराची ओळख निर्माण होते आहे. ठाण्य़ात कावेसर, लोकमान्य नगर, नागला बंदर आदी ठिकाणी अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात गेल्यावर्षी सव्वा लाख झाडे लावण्यात आली. यंदा ते लक्ष्य दोन लाखांचे होते. तेही पूर्ण करून दोन लाख ०९ हजार झाडे लावून झाली आहेत. त्यांची वाढही होते आहे. त्यामुळेच ठाणे वरून पाहताना हिरवेगार दिसते आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याचबरोबर, आणखी ऑक्सिजन पार्क तयार करावीत. तसेच, महापालिकेच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच, एक आव्हान म्हणून या उद्यानाचे काम ठाणे महापालिकेचे उद्यान अधिक्षक केदार पाटील यांनी हाती घेतले आणि ते पूर्ण केले त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राजमाता जिजाऊ उद्यानाची माहिती दिली. येथे चार-पाच दिवसांपूर्वी लावलेल्या रोपट्यापासून १०० वर्षे जुना वृक्ष आहे. साडेतीन एकर जागेत नवीन संकल्पनेसह हे उद्यान साकारले आहे. २७ ऑगस्ट रोजी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उद्यानाचा नव्याने विकास करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांची चार कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. आज त्याचे लोकार्पण होत आहे, ही मनाला समाधान देणारी गोष्ट असल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणेकरांना विविध प्रकारच्या समस्या त्रास देत आहेत. आम्ही त्यातील एकेका समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करतो आहोत, असेही राव म्हणाले.
याप्रसंगी, उद्यान अधिक्षक केदार पाटील, रचनाकार प्रणव अनायल आणि जुईली मांजरेकर, वृक्ष मित्र आनंद पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोहळ्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

