लांजा (संदेश कांबळे ) आमच्या घरादारावर नागर फिरवून जर विकास करणार असेल तर तो विकास आम्हाला नको आमची चटणी भाकरच आम्हाला पुरेशी आहे अशी आर्त विनवणी लांजा नगरपंचायतीच्या कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी डंपिंग ग्राउंडच्या विरोधात केली असून ऐन गणेशोत्सवातच गेले २२ दिवस हे ग्रामस्थ लांजा तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडत असताना देखील लांजा नगरपंचायत व महसूल प्रशासन कोणताही ठोस निर्णय देत नसल्याने प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविषयी लांजा शहरासह तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथील वस्तीलगत डम्पिंग ग्राउंड साठी जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र या जागेला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला कारण सदरची जागा ही लोकवस्ती पासून अगदी जवळ आहे तसेच या जागेवर जाण्यासाठी रस्ता देखील नाही व जिल्हाधिकारी यांनी देखील या जागेला नकार दिला होता असे असताना देखील तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी ग्रामस्थांची कोणतीही बाजू ऐकून न घेता या जागेची खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे सदर जागे संदर्भात वेळोवेळी ग्रामस्थांनी आंदोलन, निवेदन देऊन त्याचा विरोध केलेला आहे मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून अवाच्या सव्वा किमतीला ही जागा खरेदी करण्यात आली आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी यांचे देखील हात गुंतलेले असल्याने सदरच्या जागेवरच हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे
दरम्यान या जागेच्या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थ गेले २२ दिवस लांजा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडून या जागेबाबत आम्हाला ठोस निर्णय द्या व इथे डम्पिंग ग्राउंड करणार नाही अशी हमी द्या अशी मागणी लांजा नगरपंचायत व महसूल प्रशासनाकडे करीत असताना देखील या ग्रामस्थांकडे किंवा त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहण्याची तसदी सुद्धा प्रशासनाने अद्याप घेतली नसल्याने ऐन गणपती सणासुदीच्या दिवसात हे ग्रामस्थ रस्त्यावरती साखळी उपोषण छेडत असल्याने प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात तालुक्यातील जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
लांजा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तब्बल गेली २२ दिवस हे आंदोलन छेडले जात असून जोपर्यंत प्रशासन ठाम निर्णय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असून विद्यमान आमदार किरण सामंत व तत्कालीन माजी आमदार राजन साळवी यांनी या आंदोलनाला साधी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांचं म्हणणे सुद्धा ऐकून न घेतल्याने उपोषण स्थळी बसलेल्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून जर लोकप्रतिनिधीच जनतेच्या पाठीशी नसतील तर जनतेने कुणाकडे दाद मागावी आणि जर लोकप्रतिनिधी धन धानडग्यांच्या व प्रशासनाच्या पाठीशी राहून जनतेला उघड्यावर पाडणार असेल तर जनतेने आपले जीवन कसे जगावे असा संतप्त सवाल देखील मंगेश आंबेकर ,सतीश पेडणेकर राजेश आडविलकर, राजू सुर्वे आदी उपोषणस्थळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या आंदोलनाची प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास ग्रामस्थ आता उग्र आंदोलन छेडण्याची शक्यता असून त्याला प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा देखील ग्रामस्थ यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे प्रशासनाच्या विरोधात तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


