लांजा दि.१६( प्रतिनिधी ) संस्कारक्षम कथा आणि पुस्तके ही जीवनाला योग्य दिशा देत असतात आपण कोणती पुस्तके वाचतो त्यावर आपले विचार ठरत असतात शालेय जीवनात पू. साने गुरुजी यांची पुस्तके आणि कथा वाचल्या तर नक्की भावी जीवनात त्याचा उपयोग होईल आणि या देशाचे आदर्श नागरीक होऊ शकता असा विश्वास लांजा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. संपदा वाघधरे यांनी लांजा येथील साने गुरुजी कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
लांजा तालुका माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने तालुका स्तरीय पू. साने गुरुजी कथाकथन स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथील सभागृहात मंगळवार दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. संपदा वाघधरे बोलत होत्या यावेळी विचारपीठावर लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, लांजा ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. आसगावकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप तावडे, सचिव मोहम्मद सय्यद, विद्या समिती सचिव व्ही. एस. कांबळे, खजिनदार सुशांत राईन, सहसचिव अरुण डोळे, केंद्रीय सदस्य धोडिबा देसाई, श्री. इलाही मुलानी, प्रकाश हर्चेकर, सौ.दामिनी भिंगार्डे, गजानन पांचाळ, सुरेंद्र कल्लोले आदी तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
यावेळी संपदा वाघधरे यांनी बोलताना सांगितले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे त्यामुळे मोबाईल, टीव्ही किंवा सोशल मीडियावर आजचे युवक युवती अधिकचा वेळ घालवीत आहे त्यामुळे बालवयातील वाचन हरवत चालले आहे. एकीकडे विभक्त कुटुंब पद्धती व त्यातच आजच्या पिढीचे वाचन कमी झाले तर दुसरीकडे आई वडील कामाला अशा परिस्थितीत संस्कारक्षम कथा आणि विचार सांगणार कोण? म्हणून भावी पिढीच्या आदर्श जीवनासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक असून लांजा तालुका मुख्याध्यापक संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक देखील सौ. वाघधरे यांनी यावेळी केले व विद्यार्थ्यांनी सोशल मिडियापेक्षा अभ्यासाबरोबर विचारवंत व महापुरुष यांची पुस्तके देखील वाचण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, जिल्हा सचिव महेश पाटकर यांनी देखील मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खावडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. दामिनी भिंगार्डे यांनी केले. या स्पर्धा एकूण तीन गटात घेण्यात आल्या यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट तयार करण्यात आले होते तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते .तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्या समिती सचिव व्ही. एस. कांबळे, मोहम्मद सय्यद, गजानन पांचाळ,अरुण डोळे, सुशांत रायेन ,श्री. जमादार सर व श्री. कदम सर यांनी विशेष मेहनत घेतली.


