कोत्रेवाडी ग्रामस्थांचे सलग २७ दिवस उपोषण सुरू
लांजा ( प्रतिनिधी )लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या २७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाबाबत तातडीने कार्यवाही करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लांजा तालुक्याच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लांजा तालुका यांच्यावतीने बुधवार दि.१० रोजी जिल्हाधिकारी यांना लांजा तहसीलदार यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लांजा नगरपंचायतीने कोत्रेवाडी येथील वस्तीजवळ जबरदस्तीने व बोगस प्रस्तावावर आधारित घनकचरा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकल्प ग्रामस्थांच्या आरोग्यास, पर्यावरणास व जनजीवनास थेट हानिकारक असून, जिल्हा समितीनेही शासन नियम २०१६ नुसार हा प्रकल्प अयोग्य ठरवलेला आहे. असे असतानाही नगरपंचायतीने बेकायदेशीर खरेदीखत करून मोठा गैरव्यवहार केलेला आहे असा आरोप करत अन्यायाविरुद्ध कोत्रेवाडी ग्रामस्थांचा शांततामय मार्गाने सातत्याने लढा सुरू आहे.
दि. १४ ऑगस्ट २०२५ पासून तहसील कार्यालय समोर ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा २७ वा दिवस असूनही प्रशासनाने अजूनही या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही आहे. लांजामध्ये आजतागायत एवढे दिवस आंदोलन झालेलं नाही. २७ दिवस ग्रामस्थ उपोषणाला बसूनही नगरपंचायत, प्रशासन किंवा कोणतेही जबाबदार अधिकारी भेटीला आलेले नाहीत हि दुर्दैवी बाब असून ग्रामस्थावर अन्यायकारक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा लांजा तालुका शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने कोत्रेवाडीतील ग्रामस्थासह शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले निवेदन लांजा नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी स्वीकारले. निवेदन देताना शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख सुरेश करंबेळे, सौ. पूर्वा मुळ्ये, मोहन तोडकरी, सचिन लिंगायत, शांताराम गुरव, अभिजित राजेशिर्के, राजू सुर्वे, अलाउद्दीन नेवरेकर, संतोष लिंगायत व शिवसैनिक उपस्थित होते.

