ठाणे (दिवा) प्रतिनिधी – दिवा शहरात नागरी सुविधांचा गंभीर अभाव असून मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारी वस्ती वाढ लक्षात घेता, आवश्यक सुविधा मात्र अपुऱ्याच राहिल्या आहेत.त्यामुळे शहर अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे.
दिवा शहराती नागरिकांना काही प्रमुख नागरी समस्या वारंवार सतावत आहेत.नाना-नानी पार्कचा अभाव: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सुस्थितीत पार्क उपलब्ध नाहीत.
बस स्टॉपची कमतरता: अनेक ठिकाणी योग्य बसथांबे नसल्याने प्रवाशांना उन्हात-पावसात उभे राहावे लागते.
गार्डन्सची कमतरता: मुलांसाठी व कुटुंबांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे अपुरी आहेत.
अस्वच्छ रस्ते: नियमित साफसफाई होत नसल्याने रस्त्यांवर कचरा व अस्वच्छता दिसून येते.
खेळाच्या मैदानांचा अभाव: तरुणांसाठी क्रीडांगण नसल्याने त्यांना खेळासाठी योग्य जागा मिळत नाही.
हॉस्पिटल सुविधांची कमतरता: दर्जेदार व सुसज्ज रुग्णालयांची संख्या अपुरी असून आपत्कालीन सेवेत अडचणी येतात.
वस्तीगृहांचा अभाव: कामगार व विद्यार्थ्यांसाठी परवडणारी व सुरक्षित वस्तीगृहे उपलब्ध नाहीत.
पार्किंगची समस्या: नियोजित पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यांवरच वाहनांची गर्दी वाढते आणि वाहतूक कोंडी होते.
दरम्यान ज्या सुविधा ठाणे शहरातील नागरिकांना मिळतात त्याच सुविधा दिवा शहरातील नागरिकांना मिळत नाहीत,त्यामुळे नागरिकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. दरवर्षी “कर आकारला जातो, पण सुविधा मिळत नाहीत,” अशी भावना नागरिकांमध्ये वाढत असून, या सर्व समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
याबाबत नागरिकांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने दिवा परिसरासाठी विशेष विकास आराखडा तयार करून त्वरित कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे.

