ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यत आपला मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. मागील एक ते दोन महिन्यापासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाही अशा निवासी मालमत्ताधारकांचे नळसंयोजन खंडीत करणे, कर न भरणाऱ्याअनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.
सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दिनांक 03 फेब्रुवारी 2026) आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) श्री. प्रशांत रोडे, उपायुक्त श्री. जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहायक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्यावर तात्काळ जप्ती, वॉरंट बजावणे, नळ संयोजन खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे नळजोडणी व इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून १० फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ताधारकांवर जप्ती व सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच, कर वसुली वाढविण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा, असे आवाहन करण्यात आले. सन 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्याकरिता महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच फेब्रुवारी व मार्च 31.03.2026 या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (दि.03 मार्च, 2026 रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून) सकाळी 10.30 ते 4.30 तसेच सर्व रविवार सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत कर संकलनाकरिता करवसुली संकलन केंद्र व मुख्य कार्यालयही कार्यान्वीत ठेवण्यात येणार आहेत.

