लांजा दि.०६ (प्रतिनिधी)सामाजिक शिक्षण ,स्त्री शिक्षण चळवळ, शोधनिबंध आणि पत्रकारिता त्यावर प्रगल्भ लेख लिहिण्याचे काम महाराष्ट्रात प्रथम कोणी केले असेल तर ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी. त्या वेळच्या अनेक महाराष्ट्रातील विचारवंतांनी बाळशास्त्री जांभेकरांचे श्रेष्ठत्व मान्य केले म्हणून आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो ,असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी यांनी केले .
लांजा तालुका पत्रकार संघ व साईबाबा सोशल अँड स्पोर्ट्स क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महंमद रखांगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते राजन देसाई, न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत शेट्ये, नूतन नगराध्यक्षा सावली कुरूप, माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे ,प्राचार्य सुवर्णा पाटील, कृषी अधिकारी संतोष म्हेत्रे, माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, साईबाबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो, उद्योजक योगेश वाघधरे, संतोष बेनकर, लांजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप मुजावर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
Vयावेळी महंमद रखांगी पुढे म्हणाले की ,पत्रकार दिनाचे औचित्य साधून लांजा तालुका पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा स्पर्धा यासारखे लोकाभिमुख कार्यक्रम करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला उजाळा देत आहेत. त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
Bयावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते राजन देसाई म्हणाले की, स्वातंत्र्य काळात वृत्तपत्रे जन्माला आली नसती तर आपले प्रबोधन झाले नसते. स्वातंत्र्य काळामध्ये वृत्तपत्राचे फार मोठे योगदान आहे. आणीबाणीच्या काळात देखील वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानेच सत्ता परिवर्तन करण्याची ताकद लेखणीमध्ये असल्याचे दिसून आले असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांनी पत्रकारितेसारखे क्षेत्र निवडावे असे आवाहन केले .
V यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ त्याचबरोबर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेता व उपविजेताना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
Vत्याचबरोबर पत्रकार दिनाच्या औचित्य साधून समाज प्रबोधन म्हणून सुषमा देशपांडे लिखित शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने यांनी व्हय मी सावित्रीबाई हे दीर्घांक नाटक सादर केले गेले . त्यांच्या एकूण सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते .
या कार्यक्रमाची प्रस्तावना संदेश कांबळे यांनी केली सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र शेवडे तर दिलीप मुजावर यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी त्या पार पडण्याकरिता लांजा महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रा.डॉ. सुनील चव्हाण ,लांजा महाविद्यालयातील प्राध्यापक, लांजा तालुका पत्रकार संघाचे सदस्य अनिल कासारे, रिजवान मुजावर यांनी विशेष मेहनत घेतली.


