ठाणे – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळविण्यात येते की, जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ६११ पात्र शाळा असून ११,५९५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.
आरटीई २५% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दि. १७ फेब्रुवारी २०२६ ते दि. १० मार्च २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. पालकांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना
१. आरटीई कायदा २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित / विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावर २५% प्रवेश देण्यात येतो. पालकांनी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो
अनुसूचित जाती (एस.सी), इतर मागासवर्ग (ओ.बी.सी), अनुसूचित जमाती (एस.टी), विशेष मागासवर्ग (एस.बी.सी), विमुक्त जाती (अ), आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, भटक्या जमाती (ब), एच.आय.व्ही बाधित किंवा एच.आय.व्ही. प्रभावित बाल, भटक्या जमाती (क), अनाथ बालके, भटक्या जमाती (ड), दिव्यांग बालक, कोव्हिड प्रभावित
३. आर्थिक दुर्बल गटासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
४. पालकांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा पोर्टलवर दिसतील.
५. प्रवेश प्रक्रियेसाठी कमाल १० शाळांची निवड विचारपूर्वक करावी.
६. अर्ज भरताना घर व शाळेतील अंतर गुगल मॅपद्वारे निश्चित करणे आवश्यक असून निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
७. अर्ज परिपूर्ण व अचूक माहितीने भरावा.
८. अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावा; शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळाव्यात.
९. कोणतीही अडचण असल्यास पोर्टलवरील मदत केंद्रांशी संपर्क साधावा.
१०. अर्ज करताना पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र इ. माहिती अचूक भरावी.
११. यापूर्वी आरटीई २५% अंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
१२. चुकीची माहिती अथवा एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
*आवश्यक कागदपत्रे (अपलोड करणे अनिवार्य)*
• पालकांचे (आई/वडील) आधारकार्ड
• बालकांचे जन्म प्रमाणपत्र
• निवासाचा पुरावा – रेशन कार्ड / वीज बिल / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / बँक पासबुक / ड्रायव्हिंग लायसन्स इ.
• भाडेकरार (भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.)
• जात प्रमाणपत्र (वंचित घटकांसाठी)
• उत्पन्न प्रमाणपत्र – वार्षिक उत्पन्न रु. १ लाखापेक्षा कमी (सन २०२३–२४ किंवा २०२४–२५)
• दिव्यांग प्रमाणपत्र (४०% पेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्यास)
• अनाथ बालकांसाठी – अनाथालय/पालक हमीपत्र
• घटस्फोटित / विधवा / सिंगल पॅरेंट बाबतीत संबंधित न्यायालयीन/प्रमाणपत्र कागदपत्रे
• एचआयव्ही बाधित/प्रभावित बालकांसाठी शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र
बालकांचे आधारकार्ड नसल्यास तात्पुरता प्रवेश देण्यात येईल; मात्र ९० दिवसांच्या आत आधारकार्ड सादर करणे बंधनकारक राहील.


