दिवा (प्रतिनिधी ) दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा अशी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमींची जुनी मागणी आहे. दिवावसीयांच्या लोकभावनेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी त्यासंदर्भात ठराव महापालिकेत प्रशासनाकडून करून घेतला असून छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौक येथे लवकरच अश्वारुढ पुतळा उभारणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
ठाणे महानगर पालिका यांनी जारी केलेल्या पत्रात ठराव क्रमांक १०० दिनांक २५/०७/२०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामी सद्यस्थितीत विभागामार्फत शिल्पकाराची निवड करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पर्याप्त निधी उपलब्ध व्हावा व विविध प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा प्रयत्नशील असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. ही आनंदाची बातमी दिवा शहरातील तमाम शिवभक्तांना देण्यासाठी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठया संख्येने छञपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते.


