लांजा शहर : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच अनुभवातून शिक्षण या उपक्रमांतर्गत स्वावलंबन, विक्री कौशल्य व व्यवहार ज्ञान विकसित होण्यासाठी हेरिटेज प्रयोगभूमी जावडे येथे राबवित असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी देखील बदलत्या जगात नवनवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असे प्रतिपादन लांजा पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा येथे केले.
हेरिटेज संस्थेच्या समन्वयातून महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कृत पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प, सत्कोंडी (ता. रत्नागिरी) अंतर्गत लावण्यात आलेल्या झेंडू फुलांची विक्री हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, लांजा-रत्नागिरी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे व माध्यमिक आश्रमशाळा, जावडे येथील विद्यार्थ्यांनी विजयादशमी ( दसरा) सणाचे औचित्य साधून लांजा बाजारपेठ येथे झेंडू फुलाच्या विक्री स्टॉल लावला होता या स्टॉलला पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच संस्था व शाळेच्या या अभिनव उपक्रमाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
हेरिटेज संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अपर्णा पवार व संस्थापक संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अनुभवातून शिक्षण’ या उपक्रमाअंतर्गत उभारलेल्या या स्टॉलमुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व मार्केटिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या झेंडू फुल विक्रीच्या स्टॉल वर लांजा तालुक्यातील ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे , लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. कुंभार साहेब, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग तसेच तालुक्यातील अन्य मान्यवर यांनी या उपक्रमाचे तसेच मार्गदर्शक शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुक केले असून या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मिळणारा नफा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे.

