सरकार या आंदोलनाची दखल घेणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
मुंबई : कुणबी नोंदणीच्या आधारावर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देणाऱ्या राज्य सरकारच्या शासन निर्णयाला तीव्र विरोध करत कोकणातील कुणबी समाजातील कोकणवासीयांच्या वतीने मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला.या मोर्चासाठी कोकणातील 7 जिल्ह्यातील कुणबी बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले होते. विशेष बाब म्हणजे सरकार दूरच राहिले, कुणब्यांच्या मतांवर कोकणात नेते म्हणून मिरवणारे आमदार, खासदार, मंत्री यांपैकी कोणीही कुणबी बांधवांच्या या मोर्चाकडे फिरकलेही नाहीत.
कुणबी समाजाच्या विविध मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तर्फे कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव तसेच ते अबाधित ठेवण्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी कुणबी बांधवांचा संघाचे अध्यक्ष अनिल नवगने यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी एल्गार मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे काढण्यात आला.आमच्या आरक्षणात मराठा समाजाला जबरदस्तीने घुसवलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यासाठी हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे तसेच उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी सात जिल्ह्यातील कुणबी बांधवांना केले होते.या पार्श्वभूमीवर कुणबी आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले होते. काही कार्यकर्ते पारंपारिक वेशभूषेत सजलेले, डोक्यावर जय कुणबी लिहिलेली गांधी टोपी घालून हातात निषेधाचे फलक घेऊन मैदानात दाखल झाले, कार्यकर्त्यांनी शांततेतून शक्तिप्रदर्शन केले.
‘आमची सरकारकडे फार मोठी मागणी नाही.मराठा समाजाला कुणबी आरक्षणात घुसवले जात आहे ते सरकारने पहिले थांबवावे. हैदराबाद गॅझेटियर बाबत काढलेला अध्यादेश तातडीने मागे घ्यावा.आम्ही शांततेत मागणी करत आहोत. पण सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर समाज आक्रमक होईल, असा इशाराच या आंदोलकांनी सरकारला दिला.कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचनांचे पालन आंदोलकांनी केले.या दरम्यान सायंकाळी 6 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आझाद मैदानावर कुणबी बांधवांशी संवाद साधला.त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.


