लांजा ( प्रतिनिधी ) रद्द करा रद्द करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा, भाजप सरकार हाय हाय ,अरे या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने आज लांजा येथे या सरकारचा धिक्कार करत तीव्र निदर्शने केली.
सरकारने बहुमताच्या जोरावर जन सुरक्षा विधेयक मंजूर केले आहे परंतु हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करण्यात आली याचाच एक भाग म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने लांजा तहसील कार्यालयात समोर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली व सरकारच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला तसेच यावेळी लांजा तहसीलदार यांना निवेदन देऊन या विधेयकाला जनतेतून तीव्र विरोध असल्याचे देखील सांगितले.
यावेळी शिवसेनेचे( उबाठा) जिल्हाप्रमुख दत्ता कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद , राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हा नेत्या शमा थोडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश राणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापूशेठ जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, माजी सभापती सुभाष रामाणे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी विविध राजकीय पक्षाचे शेकडो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


