लांजा दि.३० (संदेश कांबळे)
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या कोकणने १५ पैकी १४ आमदार महायुतीला दिले आहे. कोकणचा विकास फक्त महायुतीच करू शकते म्हणूनच या कोकणातील सर्व नगरपरिषदेवर महायुतीचाच नगराध्यक्ष विराजमान होईल आणि कुणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही असा ठाम विश्वास व्यक्त करताना लांजा नगरपंचायतीवर सावली कुरूप यांना विजयी करून शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लांजा येथे केले
लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लांजा शहरातील शासकीय विश्रामगृह जवळील मैदानात रविवारी जाहीर महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. लांजात महायुतीच्या उमेदवारांबाबत विजयी विश्वास व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल चढविला. प्रचार सभेच्या विचार मंचावर राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत जाधव, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा संघटक विलास चाळके, शिवसेना नेते अविनाश लाड, राजेंद्र महाडिक, रिपाईचे विलास कदम, रिपब्लिकन सेनेचे नेते अनिरुद्ध कांबळे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, महेश उर्फ मुन्ना खामकर, भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, हेमंत शेट्ये, शैलेश खामकर, विराज हरमले उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना पुढे म्हणाले की, महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीची उपस्थिती खूप मोठी आहे नेहमी सांगत असतो की उमेदवारांच्या पाठीशी असतील महिला तरच मतपेटी त्यांचा नंबर पाहिला.., हेच समीकरण आहे राज्यामध्ये फिरतो आहे तेव्हा मी पाहतो आहे की माझ्या लाडक्या बहिणी मला उशिरा झाला तरी लाडक्या बहिणी या भावाला भेटायला येतात. हे मी विधानसभेत पाहिले आहे आणि तेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहतो आहे. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, उच्च शिक्षणामध्ये मुलींना सवलत बचत गटाला ताकद देण्यासाठी योजना त्यानंतर वडिलांच्या नावानंतर आईचे नाव लागण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आमच्या महायुतीने सरकारने दिला. पण सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला.., इतिहास घडवला आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींची उपस्थित पाहता लांजा मध्ये महायुतीचा विजय हा पक्का आहे. कोकण तसा शिवसेनेचा बालेकिल्ला बाळासाहेबांचे प्रेम आणि कोकणवासी यांचे बाळासाहेबांवरती प्रेम आहे. भगव्या बरोबर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई या आमच्या एकत्र आमचा बालेकिल्याच्या पाठीशी कोकणातील माणूस ठामपणे उभा आहे. मुळे कोकण शिवसेनेचा श्वास आहे आणि शिवसेना कोकणच्या माणसाचा विश्वास आहे. गेले अनेक वर्षापासून जसे नारळात पाणी तसे कोकणात शिवसेना आहे याचा अभिमान आहे आणि आपण पाहतोय कोकणात सगळीकडे भगवे वातावरण झाले आहे महायुतीचे वातावरण असून निवडणुकीत कोकणातील माणसाने विधानसभेत १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून दिले हा कोकणाने महाराष्ट्रात घडवलेला इतिहास आहे.
आमदार किरण सामंत यांनी लांजातील कृती आराखडा विषय माझ्याकडे मांडला त्याबाबत त्यांचा नेहमी लांजा शहराच्या विकासाबाबत चर्चा होत असते. त्यामुळे लांजातील लोकांना जे हवे तेच देणार. जे लोकं शहराच्या कृती आराखड्या बाबत जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहेत त्यांना सांगतो की, लांजा विकास हा शहराच्या विकासासाठी, प्रगतीसाठी असतो आणि लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत हे विकासाला चालना देणारे आमदार आहेत. त्यामुळे जे विरोध करत असतील त्यांना मी सांगू इच्छितो की कोणावरी कसलाही अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घेऊन शेवटी लांजाचा विकास तुम्हाला-या साधायचा आहे.
यावेळी पालकमंत्री तथा उदय सामंत बोलताना म्हणाले की, लांजा नगरपंचायत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायततीची सत्ता महायुतीच्या हातात देणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आपली उपस्थिती पाहता लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय हा निश्चित असेल. आणि महायुतीचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येऊन पारदर्शकपणे कारभार करतील असा विश्वास उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे व्यक्त केला. पुढे बोलताना सामंत म्हणाले की, किरण सामंत आमदार झाल्यानंतर लांजा शहरात विकास होत असून याचा विचार जनतेने करावा. केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता आहे. पुढे महायुतीचे उमेदवार अशी विकास कामे करतील की भविष्यात पालकमंत्री म्हणून एकही विकासाचे काम शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही दिली. महायुतीच्या वचन नामा मधील ३६ कामंपैकी २३ कामे ही माझ्या अखत्यारीत असून उर्वरित कामे राज्य शासनाच्या आखत्यातिरित आहेत. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ही कामे पूर्ण करणार असून संपूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्याचा विकास करत असताना सर्वांनी एकत्र येऊन विकास करायची गरज आहे. लांजावासियांच्या मनातील विकास करण्याची गरज आहे. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत कृती विकास आराखडा, डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न असेल याबाबत काही असंतुष्ट लोक लांजा वासीयांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जिल्ह्याचा पालक मंत्री म्हणून मी एक शब्द देतो की लोकांच्या मनातील विकास कामे पूर्णतः नेणार असे उदय सामंत म्हणाले.
यावेळी आमदार किरण सामंत, जेष्ठ नेते अविनाश लाड यांनी मनोगत व्यक्त करून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

