कल्याण ( वार्ताहर)-: शिवसेना शिंदे गटाचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. कल्याण डोंबिवली महापालिकेवर देखील शिंदे गट वरचढ आहे .यंदा पॅनल पद्धतीने पहिल्यांदा निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी सोयीनुसार सत्ताधारी पक्षात प्रवेशाला सुरवात केली आहे. मात्र कल्याणात मनसेमधून सेनेत आलेल्या युवा नेत्यांमुळे शिंदेंच्या सेनेसोबत एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी वाढली आहे.
कल्याणात सेना भाजपची मागील काळात सत्ता असल्याने नगरसेवक पदासाठी इच्छुकांना सेना भाजपाचा पर्याय प्राधान्यानं समोर आहे.त्याच दृष्टीने काही इच्छुक इथून तिथे राजकीय पक्षांतर करीत आहेत .कल्याण मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्याने आणि तिकीट मिळणार असल्याने नुकतेच मनसेमधील कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई दांपत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला .मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याणातील महत्वाच्या अशा पॅनल क्रमांक ६ मधून या राजकीय नाराजी नाट्याची सुरवात झाल्याचे पाहायला मिळते.कारण येथे मनसेतून आयात केलेल्या देसाई दांपत्याच्या पक्ष प्रवेशानंतर राजकारणातील केवळ १टर्म अनुभव असणाऱ्या नवख्या जोडीला तिकीट मिळाल्यास त्यांच्या करिता अनुभवी इच्छुक उमेदवारांना काम करावे लागणार आहे. त्यात शिंदे गटाला पोषक वातावरण असताना देखील शिंदे यांनी स्वतःच इतर पक्षातून आलेल्या देसाई दाम्पत्याला ग्रीन सिग्नल दिल्याने एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंच्या सेनेपासून फारकत घेतल्याच्या राजकीय नाट्यापासून शिंदेंना साथ देणाऱ्या सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.सूरज खानविलकर या पदाधिकाऱ्याने माध्यमांसमोर आपली नाराजी दुसऱ्याच दिवशी बोलून दाखविली असून देसाई यांच्या सेनेतील प्रवेशाने नाराज कार्यकर्ते थेट भाजपचा कमळ कोणत्याही क्षणी हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे.

