प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
लांजा ( प्रतिनिधी )लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांचे अहिंसेच्या मार्गाने चाललेल्या उपोषणाला 2 ऑक्टोबर गांधींजयंती दिनी तब्बल ५० दिवस पूर्ण झाले असून प्रशासनाने मात्र अद्याप याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने लांजा तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोत्रेवाडी येथील वस्तीनजीक घन कचरा प्रकल्प नको या भूमिकेवर कोत्रेवाडी ग्रामस्थ ठाम राहून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच ठेवणार असा निर्धार केला आहे. म्हणूनच गेली ५० दिवस मुसळधार पाऊस असो किंवा गणपती सण असो हे ग्रामस्थ शासनाच्या व प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावरची लढाई लढत आहे मात्र प्रशासनाचे अधिकारी कोणतेही ठोस लेखी आश्वासन देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी हे आंदोलन चालूच ठेवले आहे मात्र यापुढे कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यास व या आंदोलनास तीव्र आंदोलनाचे वळण लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासन, नगरपालिका प्रशासक तुषार बाबर, तहसीलदार तसेच जिल्हा प्रशासन जबाबबदार राहतील असा इशारा देखील ग्रामस्थानी दिला आहे.
एकीकडे स्वच्छ भारत अभियानामार्फत स्वछता पाळण्याचा व कचऱ्याचे योग्य व्यवसाथापन याचा संदेश दिला जातो परंतु लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून या मोहिमेला दुर्लक्षित करत लांजा शहरातील कोत्रेवाडी येथे भर वस्तीमध्ये घनकचरा प्रकल्प राबविला जातो आहे ही खेदजनक बाब आहे. घनकचरा प्रकल्प ( डम्पिंग ग्राउंड ) हा वस्तीपासून दूर असावा असे शासनाचे धोरण असून देखील नगरपंचायत लांजा यांनी कोत्रेवाडी येथे भरवस्ती मध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्याचा घाट घातला आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर जमिनीला जाणे-येणेसाठी शासकीय नोंद असलेला रस्ताच उपलब्ध नाही आहे. तसेच सदर जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण न करता नगरपंचायत लांजा यांनी लोकसभेच्या आचारसंहिते मध्ये जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय खरेदीखताची प्रक्रिया राबवली.
इतर जागेचे पर्याय उपलब्ध असतानादेखील लांजा नगरपंचायत एका विशिष्ट जागेवर अडून बसली आहे यामुळे यामध्ये काहीतरी गौडबंगाल असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन ठाम निर्णय घेताना दिसून येत नाही त्यामुळेच आज तब्बल ५० दिवस झाले तरी हे आंदोलन सुरू असून जो पर्यंत हा प्रकल्प रद्द केल्याचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे

