बुलढाणा(प्रतिनिधी):- उद्योगपती आणि राजकारण्यांनंतर आता इन्कम टॅक्स विभागानं आपला मोर्चा पोलीस खात्याकडे वळवला आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दलात तब्बल 1050 पोलिसांना आयकर विभागानं नोटीस बजावल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ही नोटीस आयकर विवरणपत्रात बोगस कपाती दाखवून करचोरी केल्याच्या संशयावरून बजावण्यात आली आहे. केवळ पोलीस अंमलदारांनाच नव्हे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 3 ते 4 वर्षांत काही पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या संगनमताने आयकर विवरणपत्रांमध्ये खोट्या कपाती दाखवल्या आहेत. यात गृहकर्ज, विमा, म्युच्युअल फंड, पीपीएफ यांसारख्या गुंतवणुकी नसतानाही त्या दाखवण्यात आल्याचं समोर आलं आहे. या बोगस कपाती कलम 80C आणि गृहकर्जावरील व्याज सवलतींशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे, सर्व रिटर्न्स एकाच सीएने भरल्याचंही उघड झालं आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व पोलीस अंमलदारांना आपले रिटर्न तपासून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी, या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून योग्य प्रतिक्रिया देण्यात येईल असं सांगितलं.दरम्यान गेल्या वर्षी काही शिक्षकांनीही खोट्या कारणांवरून कर परतावा मागितल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांनाही आयकर विभागाने समन्स बजावले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, बुलढाणा प्रकरणानंतर राज्यातील सर्वच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाची चौकशी होण्याची शक्यता आहे. करचुकवेगिरी करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर आता कारवाई होणार, असा इशारा विभागाने दिला आहे.

